डोक्यात फणस पडल्यामुळे कोरोना झाल्याचे समजले
हा व्यक्ती झाडावरुन फणस काढत होता. त्यावेळी एक फणस जोरात त्याच्या डोक्यावर आदळला.
कासारगोडा: देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक विचित्र घटना ऐकायला मिळत आहेत. केरळमध्ये असाच एक प्रकार समोर आला. येथील कासारगोडच्या बेलूर गावात एका व्यक्तीच्या डोक्यात फणस पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले तेव्हा हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक माहितीनुसार, हा व्यक्ती झाडावरुन फणस काढत होता. त्यावेळी एक फणस जोरात त्याच्या डोक्यावर आदळला. हा आघात इतका जबरदस्त होता की, या व्यक्तीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे व्यक्तीच्या हातापायातील ताकद गेल्याचे समजते.
तिरुपती बालाजीचा अर्ध्या किंमतीतला प्रसाद घेण्यास भाविकांची गर्दी
जखमी अवस्थेत या व्यक्तीला रुग्णालयात आणण्यात आले. तेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा व्यक्तीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. हा व्यक्ती पेशाने रिक्षाचालक आहे. मात्र, त्याला कोरोनाची लागण कशी झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, प्राथमिक अंदाजानुसार कोरोनाबाधित प्रवाशांच्या संपर्कात आल्याने त्याला विषाणूची लागण झाली असावी, अशी शक्यता आहे.
या घटनेनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत ७९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केवळ चार जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे केरळने कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले आहे.
गुजरात म्हणजे बुडणारं 'टायटॅनिक' जहाज; उच्च न्यायालयाचे ताशेरे
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल सात हजार रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्ययंत्रणांची चिंता वाढली आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १,३८, ८४५ इतकी झाली आहे.