मोठ्या राजकीय नेत्याच्या निधनाची माहिती प्रथम PMO ला का दिली जाते?
जून, १९८६मध्ये अखिल भारतीय रेडिओने खासदार जगजीवन राम यांच्या निधनाची चुकीची माहिती दिली.
नवी दिल्ली : जून, १९८६मध्ये अखिल भारतीय रेडिओने खासदार जगजीवन राम यांच्या निधनाची चुकीची माहिती दिली. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी मॉरिशसच्या दौऱ्यावर जात होते. ते विमानतळावर पोहोचले आणि लगेचच, जगजीवन राम यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. ते लगेचच विमानतळातून तात्काळ हॉस्पिटलला पोहोचले.
विमानतळाच्या लाउंजमध्ये मीडियाचे प्रतिनिधी बसलेले होते. ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तानंतर जगजीवन राम यांचे निधन झाले ही बातमी समजली. त्यानंतर, जेव्हा राजीव गांधी हॉस्पिटलमधून पालम विमानतळावर आले. तेव्हा सर्वांना कळले की जगजीवन राम आजारी आहेत. त्यांचे निधन झालेले नाही.
या चुकीनंतर आपली चूक सुधारत ऑल इंडिया रेडिओने चुकीबद्दल जाहीर माफी मागितली. खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागूनही वाद निर्माण झाला. बाबू जगजीवन राम जिवंत होते. त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. या प्रकारानंतर सरकारने चौकशी केली. आणि व्हीआयपींच्या निधनानंतर माहिती देण्याबाबत ऑल इंडिया रेडिओसाठी नियम तयार केले गेले. तेव्हापासून, मोठ्या नेत्याच्या निधनाची माहिती प्रथम सरकारच्या उच्च पातळीवर नोंदविली जाते.