जम्मू काश्मीर : एका आठवड्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान
एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत त्यांचा खात्मा करण्याची कारवाई भारतीय सैन्याकडून सुरु आहे. सुरक्षा दलाकडून शनिवारी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात शुक्रवार रात्रीपासून चकमक सुरु होती. दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. याआधी शोपियाँ जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये हिज्बुलच्या काही प्रमुख कमांडरांसह 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यामुळे या एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं.
यावर्षी सुरक्षा दलाकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जवळपास 95वर गेला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, देशभरात लागू असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास 1 एप्रिल ते 10 जूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विविध चकमक आणि कारवायांमध्ये सुरक्षा दलाकडून जवळपास 68 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
काही दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. सुरक्षा दलाकडून नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानी सेनेची भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.