श्रीनगर : जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर, राजकीय आरोप-प्रत्त्यारोपांना उधाण आलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनीही भाजपवर टीका केली. दरम्यान, सत्ता स्थानप करण्यासाठी नवी आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


नवे समीकरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्‍मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पुढाकाराने नवी आघाडी उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपला एकाकी पाडण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या अन्य दोन पक्षांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळपासूनच या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाली. माकपचे ज्येष्ठ नेते एम. वाय. तारिगामी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने 'पीडीपी'बाबत मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे नवी राजकीय समिकरण जुळणार असे संकेत मिळत आहेत.


राज्यपालांच्या निर्णयावर उमर अब्दुल्ला नाराज


राज्यातील राज्यपाल राजवट संपून लवकर विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात म्हणून 'नॅशनल कॉन्फरन्स' आग्रही होते. पण 'पीडीपी'ने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केल्याने उमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली.. दरम्यान, राजभवनाशी तत्काळ संपर्क होऊ न शकल्याबद्दल अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला. तसेच राजभवनातील फॅक्‍स मशीन तातडीने दुरुस्त करा, असा टोलाही लगावला.


पाकिस्तानची फूस - भाजप


जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीला पाकिस्तानची फूस असल्याचा आरोप, भाजपचे महासचिव राम माधव यांनी ट्वीटद्वारे केला. त्याला जोरदार आक्षेप घेत, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राम माधव यांना त्यांचे आरोप सिद्ध करण्याचं आव्हान ट्वीटद्वारे केलं. त्यानंतर राम माधव यांनी आपले शब्द मागे घेतले.