जम्मू-काश्मीर: पुलवामा जिल्ह्यातील सिरनू या गावात शनिवारी भारतीय लष्कर आणि जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिकांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सध्या काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या भागात सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी रवाना झाला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम हाती घेतली. यानंतर झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर एक भारतीय जवान शहीद झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकरचा समावेश आहे. जहूरने राष्ट्रीय रायफल्सचे जवान शहीद औरंगजेब यांची हत्या केली होती. जहूर दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी जहूर हा टेरिटोरियल आर्मीत होता. तो गेल्या वर्षी जुलैमध्ये पळाला होता. दहशतवाद्यांना जाऊन सामील झाला होता. 




दरम्यान, या चकमकीच्यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. ते चकमकीच्या ठिकाणी येऊन कारवाईत अडथळा आणत होते. सुरक्षा दलांनी नागरिकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमाव आणखी आक्रमक झाला. त्यांनी लष्कराच्या गाडीवर हल्ला चढवला. तसंच जवानांवर जोरदार दगडफेक सुरू केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासठी जवानांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात ७ नागरिकांचा मृत्यू झाला.