जम्मू काश्मीर : अवंतीपोरामधील चकमकीत २ जवान शहीद
या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यामंध्ये चकमक झाली आहे. अंतवतीपोराच्या जंगलामध्ये चकमक होत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षादलाकडून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मात्र, चकमकीदरम्यान २ जवान शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूने गोळीबार सुरु असून, सुरक्षादलाकडून २ ते ३ दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे.
मंगळवारीदेखील जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शोपियनमधल्या वाची इथे ही चकमक झाली. हे तिनही आरोपी हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी जोडलेले होते. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर सेना, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या टीमकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानने, जम्मू-काश्मीरमधील राजोरी आणि पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा तोडत रहिवाशी आणि सैन्य तळांवर गोळीबार केला. एक तासापर्यंत चाललेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानकडून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु पुन्हा पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु झाला. भारतीय सैन्याकडून गोळीबाराला चांगलंच प्रत्युत्तर देण्यात आलं.
दोन दिवसांपूर्वीदेखील जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. पाकिस्तानकडून, पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी, राजौरी सेक्टरमधील तारकुंडी भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ दहशतवाद्यांच्या पथकाला भारतीय सैन्याने पळवून लावलं होतं.