जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील सीमाभागात गोळीबार केला. पुंछमधील देवगान परिसरात पाकिस्तानने फायरिंग केली तसेच सीमेवर मोर्टार फायरही करण्यात आले.
पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अद्यापही गोळीबार सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे.
बुधवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील परिसरात गोळीबार केला होता. यावेळीही भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
गुरुवारी सकाळीही आठ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.
दोन नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून सांबा सेक्टरमधील बीएसएफच्या तळावर गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला.