जम्मू काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून ऑपरेशन, दोन दहशतवादी ठार
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून दोन दहशतवाद्यांना (2 Terrorists killed in Shopian) ठार करण्यात आलंय. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली. शोपियां जिल्ह्यातील मुनिहाल भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले.
रात्री दोन वाजता ऑपरेशन
शोपियांच्या मनिहाल भागात रात्री दोनच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. जम्मू-काश्मीर पोलिस, सेना आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. सद्यस्थितीत कारवाई सुरू असून सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
11 मार्चपासून 5 दहशतवादी ठार
11 मार्चपासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी शोपियानमध्ये 13 मार्चच्या रात्री सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एक अतिरेकी ठार मारला होता. अतिरेक्यांकडून एम -4 कार्बाईन, 36 काडतुसे, 9600 रुपये आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.
यापूर्वी 11 मार्च रोजी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत जैंशच्या दोन दहशतवाद्यांना 18 तासाच्या ठार करण्यात आले होते. दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल, पिस्तूल, ग्रेनेड आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या.