Vaishno Devi Temple : महाराष्ट्रात पाऊस धुंवाधार बरसत असतानाच आता देशभरातही पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये थैमान घालणाऱ्या पावसाचे थेट परिणाम आता जम्मू काश्मीरपपर्यंत दिसून येत आहेत. जिथं वैष्णो देवी मंदिर मार्ग ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री उशिरापासून सुरु असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळं कटरा मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिवाय मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या इतर वाटांवरील वाहतुकही ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं भूस्खलनाच्याही घटना घडल्यामुळं संभाव्य धोका आणि यात्रेकरुंची सुरक्षितता पाहता यात्रामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या बचाव पथकं आणि संबंधित यंत्रणा मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या वाटेवरील दरड हटवण्याचं काम हाती घेताना दिसत आहेत. 


एकिकडे वैष्णो देवी मंदिराकडे जाणारा नवा (हिमलोटी मार्ग) मार्ग बंद केलेला असताना दुसरीकडे रियासी जिल्ह्यातून मंदिराच्या दिशेनं निघणारी हेलिकॉप्टर सेवाही निलंबित करण्यात आली आहे.


देशातील पर्जन्यमानाविषयी आयएमडीचं काय म्हणणं? 


भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि स्कायमेटच्या वृत्तानुसार उत्र तेलंगणा, विदर्भासह छत्तीसगढच्या दक्षिण भागामध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण गोव्यासह राजस्थान, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलच्या काही भागांत पुढील 24 तासांत पावसाच्या जोरदार सरी बरसतील. तर, पूर्वोत्तर भारत, सिक्कीम, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि केरळामध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : मुंबई लोकलमध्ये मोठे बदल होणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राखीव डब्यांबाबत मोठी माहिती


 


पर्वतीय क्षेतांमध्ये अर्थात लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असे. 21 आणि 22 जुलै रोजी उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळू शकतं. तर, 20 ते 21 जुलैदरम्यान हिमाचल प्रदेशात पाऊस पुन्हा अडचणी निर्माण करु शकतो. 


पुढील चार दिवसांसाठी देशाच्या पर्वतीय भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, मध्य प्रदेशातील विविध भागांमध्येही पावसामुळं त्रेधातिरपीट होऊ शकते. 22 जुलै रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला पावसाचा मारा सहन करावा लागू शकतो अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.