नवी दिल्ली :जम्मू काश्मीरच्या हिंदवडामध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. हा स्फोट 15 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये झाला आहे. यामध्ये सेनेचे दोन जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडा क्षेत्रात लखमपोरा राजवारमध्ये 15 राष्ट्रीय रायफल्स कॅम्पच्या आतमध्ये हा रहस्यमय स्फोट झाला. हा एखादा अपघात असू शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, पाकिस्तान लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी संधी शोधत आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयनं दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसहीत तीन टीम काश्मीर खोऱ्यासाठी बनवल्यात. या टीम निवडणुकीदरम्यान पोलिंग बूथ आणि उमेदवारांना आपलं लक्ष्य बनवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील शांती भंग करण्यासाठी 'आयएसआय' स्फोटकांचा वापर करण्यासाठी अफगानिस्तानात प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवादयांना खतपाणी घालत आहे. 


दरम्यान, पाकिस्तान लष्करानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. दिगवार आणि करमाडा सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. त्यात दोन जण जखमी झालेत. कमाल दीन आणि नसीम अख्तर अशी जखमींची नावं आहेत. जखमींवर पुंछमधल्या राजा सुखदेव सिंह रुग्णालयात उपचार सुरुयत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. प्रशासनाकडून जखमींची विचारपूस करण्यात येतेय.