`अमित शाह यांच्यासाठी छोटी भेट`; पोलीस महासंचालकाला संपवल्यानंतर TRFचा खळबळजनक दावा
अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना समोर आलीय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) सोमवारपासून तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरचे (J&K) महासंचालक हेमंत लोहिया (Hemant Kumar Lohia) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी ते घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात राज्यातील एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. हत्येनंतर हेमंत लोहिया (Hemant Kumar Lohia) यांचा नोकर बेपत्ता आहे, त्यामुळे त्याने ही घटना घडवून आणली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (Jammu Kashmir DG Jail Hemant Lohia Murder)
आज तकच्या वृ्तानुसार, जम्मू-काश्मीरचे (J&K) कारागृह महासंचालक हेमंत कुमार लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी टीआरएफ (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) कार्यरत असलेल्या या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. ही घटना जम्मूच्या उदयवाला येथील आहे. हेमंत कुमार लोहिया रात्री घरी असताना त्यांच्या घरातील नोकर यासिरने त्यांच्यावर हल्ला केला आणि केचपच्या बाटलीने त्यांचा गळा चिरला. त्यानंतर त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
महासंचालक हेमंत कुमार लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सांगितले आहे की, "त्यांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही हत्या केली. इतकी कडक सुरक्षा असतानाही जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांना त्यांच्याकडून ही एक छोटीशी भेट आहे."
जम्मू काश्मीर खोऱ्यात अलीकडेच सक्रिय झालेल्या या दहशतवादी संघटनेने हा हल्ला करताना दाखवून दिले आहे की, ते हवे तेव्हा, हवे तिथे हल्ला करू शकतात. या दहशतवादी संघटनेने दावा केला आहे की ते भविष्यातही अशी दहशतवादी कारवाया करत राहतील. टीआरएफचे प्रवक्ते तन्वीर अहमद राथेर यांनी हे वक्तव्य जारी केले आहे.