नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अघोषित युद्धाला सुरुवात झाली आहे. या हल्ल्यानंतर देशात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांच्या बाबतीतही भारत सरकार सतर्क आहे. यासंदर्भात जम्मू काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या तुरंगात असलेल्या सात पाकिस्तानी कैद्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये शिफ्ट केले जाण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडे उत्तर मागितले आहे. हे कैदी इतर कैद्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जम्मू काश्मीर सरकारने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जर तिहाड जेलमध्ये पाठवणे शक्य नसेल तर त्यांना हरियाणा आणि पंजाबच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या तुरूंगात स्थलांतरित केले जाऊ शकते असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी होईल असे यावर खंडपीठाने सांगितले. या पाकिस्तानी कैद्यांवर कडक कारवाई करण्याची नोटीस देण्याचे निर्देश राज्य सरकारने वकिलांना दिले आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला जम्मूच्या जेलमधून इतर ठिकाणी स्थलांतरीत पाठविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


पाकचे धाबे दणाणले 



पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताकडून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या सगळ्या वातावरणामुळे पाकिस्तान युद्धाच्या तयारीला लागल्याचे समजते. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर इम्रान खान यांनीही आम्ही भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची गर्जना केली होती.