लेह : पश्चिम बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले असता लेह येथे त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदींनी लेहवासियांकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. लेहमध्ये उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. ज्यानंतर त्यांनी कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी स्थानिकांचे आभार मानले. इतकच नव्हे, तर इमारतीचं भूमिपूजन आपण केलं असून, त्याचं लोकार्पणही आपणच करण्यासाठीही आपणच येणार असल्याचं ते म्हणाले. जनतेचा आशीर्वाद मिळाला तर लोकार्पण सोहळ्यालाही आपणच येऊ, असं म्हणत मोदींनी आगामी लोकसभा निवडणूकांना नजरेत ठेवत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणूकांसाठीचं एकंदर वातावरण पाहता यावेळीही सत्तास्थापनेसाठी भाजप प्रयत्नात असून, त्याच मार्गाने मतदारांना प्रभावीत करण्याच्या दृष्टीने पावलंही उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 




यावेळी लेह- लडाख आणि त्या परिसरातील भागांच्या विकासामध्ये आपण कोणतीच उणीव राहू देणार नसल्याचं आश्वासनही मोदींनी दिलं. आपण एक असे पंतप्रधान आहोत जे देशाच्या कानाकोपऱ्याच जाऊन आलो आहोत ही बाब अधोरेखित करत त्यांनी अधिकाऱ्यांविषयीच्या अनेक गोष्टीही आपण जाणत असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी लेह परिसर आणि क्षेत्रातील वाढत्या पर्यटनाचा आढावा घेतही त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. 



बिलासपूर-मनाली-लेह हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते लेहदरम्यानचं अंतर कमी होणार असून, त्याचा फायदा थेट पर्यटन क्षेत्राला होणार असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केला. रविवारी लेह येथे पोहोचलेल्या मोदींनी विविध विकास कामांची पाहणी करत २२० केव्ही ट्रांसमिशनच्या रेल्वेमार्गाचं उदघाटनही केलं. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोषणा, विकासकामांची पाहणी आणि एकंदरच मोदींचे दौरे हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरत आहे.