Jammu Kashmir receives season`s first snowfall : इथं भारतातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झालेला असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडे मात्र आता थंडीची चाहूल लागताना दिसत आहे. उत्तराखंडपासून राजस्थानपर्यंत आता मान्सूननं परतीची वाट धरण्यास सुरुवात केलेली असतानाच अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याची बाब समोर आली आहे. कारण, इथं हिवाळ्याची चाहूल लागली असून, मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आभाळातून भुरभुरणारा कापूर खाली पडावा तसा बर्फ जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्ये पडला आणि इथं स्थानिकांसोबतच भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. सोनमर्ग, गुलमर्ग, शेषनाग या आणि अशा अनेक भागांमध्ये रविवारपासूनच बर्फवृष्टीची सुरुवात धाली. बंदीपोरा येथील गुरेझ व्हॅली, तुलैल येथील किलशे टॉप अशा भागांमध्ये बर्फवृष्टीनंतर निसर्गाचं रुप पालटलं. सर्वत्र बर्फातीच चादर पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं या भागाला पृथ्वीवरचं स्वर्ग का म्हटलं जातं हेच अनेकांच्या लक्षात आलं. 


हेसुद्धा वाचा : अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत 


 





पर्यटनाचा काळ नजीक 


डिसेंबर ते मार्च या कालावधीत जम्मू काश्मीर भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा मोठा असतो. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये इथं येण्याचे एकाहून अधिक पर्याय हाती असल्यामुळं ऑक्टोबरच्या अखेरपासूनच पर्यटकांची गर्दी इथं पाहायला मिळते. फक्त बर्फाच्छादित प्रदेशच नव्हे, तर गुलमर्ग येथे विंटर स्पोर्ट्सही असल्यामुळं इथं अॅडव्हेंचर प्रेमींची आवर्जून हजेरी असते. शिवाय परदेशात लोकप्रिय असणारा स्किईंग प्रकारही इथल्या बर्फाच्या मैदानांवर करणं शक्य होतं. 


सध्याच्या घडीला जम्मू काश्मीर भागात झालेल्या या बर्फवृष्टीमुळं इथं काश्मीर खोऱ्यातील तापमानाचा आकडा बऱ्यापैकी कमी झाला आहे. सध्याच्या घडीला इथं कमाल तापमान 15 अंश तर किमान तापमान 3 अंश सेल्शिअस इतकं असून, श्रीनगरमध्ये मात्र तुलनेनं तापमानाचा आकडा जास्त असल्याचं लक्षात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांसाठी जम्मू काश्मीरमध्ये वातारण कोरडं असेल. तेव्हा आता तुम्ही इथं नेमके कधी जाताय याचा बेत आखायलाच लागा.