Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद
Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.
Jammu and Kashmir Terror Attack: एकिकडे सत्ताधारी जम्मू काश्मीरमधून दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे या भागात दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. त्यातच एका घटनेनं संपूर्ण देशाला हादला दिला. गुरुवारी रात्री येथील राजौरी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करत लष्करी वाहनाला निशाण्यावर घेतलं. ज्यामुळं या भागात परिस्थिती प्रचंड तणावात पाहण्यास मिळाली.
दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला निशाणा करत केलेल्या या बेछूट गोळीबारामध्ये 4 जवान शहीद झाले, तर तीन गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर आता सूडाच्या भावनेनं पेटून उठलेल्या भारतीय लष्करानं पूंछ, राजौरी भागामध्ये शोधमोहिम हाती घेतली.
हेसुद्धा वाचा : राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी
पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी करत तातडीनं या भागात शोधमोहीम हाती घेतली असून, सध्याही ही मोहिम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार ‘पिपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाहा हल्ल्याचा थरारक घटनाक्रम
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनसार लष्कराची एक तुकडी पुंच जिल्ह्यातील ढेरा की गली या भागामध्ये लष्करी शोधमोहिमेसाठी निघाली होती. बुधवारी रात्रीपर्यंत लष्कराकडून ही शोधमोहिम सुरुच होती. या भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणखी एक तुकडी या दिशेनं रवाना झाली. पण, गुरुवारी रात्रीच्या सुमारास इथं येणाऱ्या लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. राजौरीनजीक असणाऱ्या लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर त्यांनी हा भ्याड हल्ला केला.
राजौरीमध्ये सुरु असणाऱ्या या दहशतवादी कारवाया आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच प्रत्येक हल्ल्याची परतफेड करण्यासाठी भारतीय लष्करानं कंबर कसली असून, आता या भागाताच कानाकोपरा पिंजून काढला जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करण्यासाठी 'गोरिल्ला युद्ध निती'चा अवलंब करत आहेत. जिथं ते हल्ला केल्यानंतर दाटीवाटीच्या जंगलांमध्ये लपण्यासाठी आधार घेत आहेत. जंगलाच्या दुसऱ्या बाजूनं बाहेर पडत हे भ्याड हल्लेखोर पुन्हा नव्यानं हल्ल्यांसाठी सज्ज होकत आहेत. राजौरी आणि पूंछ सीमाभागात ढेरा की गली आणि बुफलियाज या भागांमध्ये घनटाद जंगलांचं प्रमाण अधिक असल्यामुळं लष्कराच्या शोधमोहिमेत अनेक आव्हानं उभी राहत आहेत.