Independence Day 2021: सुरक्षा दलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, 4 दहशतवादी अटकेत
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले, 4 जणाना बेड्या
श्रीनगर: स्वतंत्र्य दिनाआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वतंत्र्य दिनानिमित्तानं मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळला आहे. पूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या तयारीमध्ये असताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवाद्यांचा हल्ल्याचा मनसुबा हाणून पाडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. जैश-ए-च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून 4 दहशतवाद्यांना अटक केली.
जम्मू -काश्मीर पोलिसांनी पकडलेले हे दहशतवादी मोटारसायकल IED वापरून स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा मनसूबा मोडून पाडण्यात यश मिळालं. पोलिसांनी या दहशतवाद्यांसह त्यांच्या साथीदारांना अटक केली.
दहशतवाद्यांनी हल्ल्याची तयारी केली होती. ते ड्रोनमधून सोडलेली शस्त्रे जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांकडे पोहोचवून हल्ल्यात मदत करत होते. 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते मोटरसायकलला IED लावून हल्ला करण्याचा कट होता. यासाठी त्यांचं नियोजनही सुरू होतं. मात्र ह्या कटाची महिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी हा कट उधळून लावला.
याआधी पंजाबच्या सीमेवर ड्रोन पकडण्यात आले होते. तर अनंतनागमध्ये देखील हल्ला घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क होतं. जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
जम्मू-काश्मीरसह काही प्रमुख शहरांमध्ये स्वातंत्र्य दिन लक्षात घेता सुरक्षेबाबत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दले सातत्याने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत आहेत आणि त्यांचे कट उधळून लावत आहेत. या दरम्यान, दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त केली आहेत.