नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनधन बँक खाती उघडण्यात आल्याने खासकरून ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात घट झाल्याचे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या इकॉनॉमिक रिसर्च विंगच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 


जनधन, आधार आणि मोबाईल (JAM) हे तीन घटकांच्या समन्वयामुळे सरकारला अनुदानाची रक्कम अधिक योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दारू आणि तंबाखू यासारख्या हानिकारक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमधील लोकांच्या जीवनशैलीतही लक्षणीय फरक पडला. या अहवालानुसार ऑक्टोबर २०१६ पासून हे बदल दिसायला सुरूवात झाली. त्यानुसार ग्रामीण भागातील लोकांचा आरोग्य सुविधांवरील खर्च वाढला आहे. तसेच ज्या ठिकाणी जनधन बँक खात्यांचे प्रमाण जास्त आहे, त्या गावांमधील महागाईदेखील कमी असल्याचे एसबीआयच्या निदर्शनास आले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जनधन योजनेंतर्गत खातं उघडण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेनी मोठा प्रतिसाद दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जवळपास ३० कोटी जनधनची खाती उघडण्यात आली आहेत. देशभरातील १० राज्यांतील खात्यांची संख्या ही २३ कोटी इतकी आहे. यापैकी ६० टक्के खाती ही ग्रामीण भागात उघडण्यात आली. यात उत्तर प्रदेश ४.७ कोटींच्या खात्यांसह अव्वल आहे.