मुंबई : बुरखा बंदीचं समर्थन करताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी घुंघटबंदी करण्याचीही मागणी केली आहे. सरकारला बुरखाबंदी करायची असेल तर मग राजस्थानमध्ये घुंघटबंदीही करा अशी मागणी अख्तर यांनी केली आहे. तर दुसरीकडे, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरही अख्तर यांनी निशाणा साधला आहे. चूका करूनही लोकं उजळ माथ्याने फिरतात, असं अख्तर यांनी म्हटलं आहे. भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन स्वत:चा पराभव स्वत:च मान्य केला आहे अशी टीकाही ज्येष्ठ गीतकार अख्तर यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे मोदी सरकारवर, भाजपच्या विचारधारेवर टीका करतानाच दुसरीकडे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचं कौतुकही अख्तर यांनी केलं आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून बुरख्यावर बंदी घालावी म्हणून काही जणांकडून मागणी होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून देखील बुरख्यावर बंदी घालावी म्हणून एक अग्रलेख आला होता. पण हा अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर आरपीआय आणि मुस्लीम धर्मगुरूंनी यावर टीका केली. या मागणीवर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी देखील जोरदार आक्षेप घेतला होता. पण ही शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं.


केरळमधील एका महाविद्यालयाने बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या आवारात बुरखाबंदी करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.के.फजल गफुर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण चेहरा झाकला जाईल अशा बुरख्यावर राज्यातील मल्लपूरम जिल्ह्यातील मुस्लीम एज्युकेशन सोसायटीने बंदी घातली आहे. राज्यात एमईएस ग्रुपच्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. ज्यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम देखील आहेत. मात्र,संस्थेच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे.