रिक्षाला रुग्णवाहिका बनवून लोकांची सेवा करणारा `देवदूत` जावेद खान
गरजुंना मोफत सेवा देणारा रिक्षा चालक
भोपाळ : कोरोना रुग्णांची दररोज होत असलेल मोठी वाढ ही चिंतेचं कारण बनली आहे. पण या काळात बरेच समाजसेवक आणि व्यक्ती अहोरात्र गरजुंची मदत करत आहेत. मध्य प्रदेशमधील असाच एक रिक्षा चालक लोकांची सेवा करत आहे. ज्याने लोकांच्या मदतीसाठी आपल्या रिक्षालाच रुग्णवाहिका बनवली आहे.
जावेद खान असं या चालकातं नाव असून त्याने म्हटलं की, 'मी या कामासाठी माझ्या पत्नीचे दागिने विकले. रीफिल सेंटरमध्ये ऑक्सिजनसाठी रांगेत उभा असतो. माझा संपर्क क्रमांक सोशल मीडियावर आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास लोक माझ्याशी संपर्क साधू शकतात. मी हे काम 15 ते 20 दिवसापासून हे काम करत आहे. आतापर्यंत 9 रुग्णांना रुग्णालयात नेले गेले, ज्यांची प्रकृती खूपच वाईट होती.' जावेद यांच्या ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, सॅनिटायझर आणि ऑक्सिमीटरसह सर्व आवश्यक वस्तू आहेत.
या निर्णयाबाबत जावेद यांनी एएनआयला सांगितले की, व्हॉट्सअॅपसह विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर लोकांच्या समस्या पाहून आपण याची सुरूवात केली. जावेद म्हणाले की, रुग्णवाहिकांची सोय नसल्यामुळे जे लोक आपल्या नातेवाईकांना खांद्यावर रूग्णालयात घेऊन जात होते त्यांना मी पाहिले. ते पुढे म्हणाले, 'मी माझ्या बायकोचे दागिने विकले आणि 5000 रुपयांना ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतला व तो ऑटोमध्ये बसविला.'
जेव्हा देशात ऑक्सिजनची कमतरता आहे. तेव्हा त्यांना ऑक्सीजन कुठून मिळणार? यावर जावेद म्हणाले, 'गोविंदपुरा येथे एक कारखाना आहे, आम्ही तिथून ऑक्सिजन भरतो. हे एक अवघड काम आहे कारण लाइनमध्ये उभे राहावे लागते. त्यासाठी 4-5 तास लागतात.'