भारतीयांना आजही अस्वस्थ करते ही दुर्घटना
घरांची दारं, खिडक्या कापड लावून बंद करा. योग्य त्या बचावात्मक सूचना दिल्या असत्या, तर हजारो लोकांचा जीव वाचवता आला असता.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : ३ डिसेंबर १९८४, भोपाळ शहरातल्या या दिवसाची सुरूवात अशा एका घटनेनं झाली, जी जगातील सर्वात दु:खद घटना समजली गेली. भोपाळ दुर्घटनेच्या खूणा आजही दिसतायत. निष्पाप लोकांच्या शरीरावर या घटनेचा विपरीत परिणाम झाला आहे.
३ हजार जणांना जीव गमवावा लागला
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ३ हजार जणांना जीव गमवावा लागला. हजारोंना कायमचं अंपगत्व आलं, काहींना दुर्धर आजारानं ग्रासलं. या २५ वर्षांच्या काळात आणि १५ हजार लोकांचा मृत्यू झालाय आणि हे सुरूच आहे.
गॅस रोखणारी कोणतीही यंत्रणा नव्हती
युनियन कार्बाइड फॅक्टरीच्या आजूबाजूला दाट लोकसंख्य़ा होती. जवळच्या जुन्या भोपाळ शहरात काही हजारांच्यावर लोकसंख्या होती. या किटकनाशक कंपनीत अपघाताचा सामना करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती.
प्रॉडक्शन जास्त झाल्याने मोठी कपात
मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झाल्याने मॅनेजमेंटनं आपलं काम कमी करायचं ठरवलं होतं. जवळ-जवळ एक तृतीयांश कर्मचाऱ्यांची कपात कंपनीनं केली. सुरक्षेसाठी असणाऱ्या बंदोबस्तातही कपात करण्यात आली.
अत्यंत विषारी मिथेल आयसोसायनेट
फॅक्टरीत तयार होणाऱ्या किटकनाशकाचा मुख्य घटक होता मिक म्हणजेच मिथेल आयसोसायनेट. हा गॅस अत्यंत विषारी असतो.
विषारी गॅसची निर्मिती होऊन प्रचंड उष्णता
मिथेल आयसोसायनेट थंड वातारणात ठेवला जातो. खासकरून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाण्यापासून दूर ठेवला जातो. पाण्याच्या संपर्कात येताच मिथेल आयसोसायनेटवर तीव्र रासायनिक अभिक्रिया होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी गॅसची निर्मिती होऊन प्रचंड उष्णताही तयार होते.
अशी घडली भोपाळ गॅस दूर्घटना
त्यारात्री एक कर्मचारी पाईप-लाइन पाण्याने साफ करताना ही दुर्घटना घडली. सफाई करण्याआधी त्या कर्मचाऱ्याने त्या पाईपला सुरक्षिततेसाठी कोणत्याही साधनांचा वापर केला नाही. पाईप साफ करताना पाणी त्या टाकीत पोहचलं ज्या टाकीत मिथेल आयसोसायनेट भरला होता. त्याचं तापमान २०० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचलं आणि विषारी गॅस तयार झाला.
तेव्हा भोपाळ शहर साखर झोपेत होतं
सुरक्षिततेसाठी कोणतेही उपाय नव्हते, असलेली साधनं काम करत नव्हती. ज्या वेळी गॅस पसरत होता भोपाळ शहर साखर झोपेत होतं.लोकांना केवळ एवढीच सूचना देण्यात आली की गॅस गळती झाल्याने घराबाहेर येऊ नये. घरांची दारं, खिडक्या कापड लावून बंद करा. योग्य त्या बचावात्मक सूचना दिल्या असत्या, तर हजारो लोकांचा जीव वाचवता आला असता.
आणि तरीही कंपनीने हात झटकले
पन्नास हजाराच्या आसपास लोकांना पॅरलिसीस, रोग प्रतिकारक क्षमतेत कमतरता तसेच कायमचं अंधत्व आलं. युनियन कार्बाइडनं ह्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर हा सर्व असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी केलेला प्रताप असल्याचं सांगून कंपनीनं हात झटकले. कायद्यानुसार कंपनीनं पीडितांना प्राथमिक मदत म्हणून पैसे दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आजही पैशाचं वाटप सुरू आहे.
पाहा ते भयंकर क्षण