Viral Video: टोलनाक्यावर टोल भरण्यावरुन कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये नेहमी वाद होत असतात. कधी टोलवसुलीला विरोध तर कधी नियमांचं पालन न होत असल्याने हे वाद होत असतात. दरम्यान नुकतंच उत्तर प्रदेशातील हापूड येथे टोलनाका जेसीबी चालकाने उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्क बसेल. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली-लखनऊ हायवे राष्ट्रीय महामार्ग 9 च्या पिलखुवा कोतवाली अंतर्गंत येणाऱ्या छिजारसी टोल प्लाझावरुन चाललेल्या जेसीबी चालकाकडे टोल मागणं कर्मचाऱ्यांना फारच महागात पडलं. संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाका पूर्णपणे उद्ध्वस्त करुन टाकला. 


मंगळवारी सकाळी ही घटना घडली. 'अरे टोल दे,' असं टोल कर्मचारी ओरडत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. यानंतर काही वेळातच बुलडोझर चालक तोडफोड करण्यास सुरुवात करतो. त्याने दोन्ही बूथ उद्ध्वस्त केल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी दिली आहे. चालक टोलनाक्याची तोडफोड करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर सगळा प्रकार कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



टोल मॅनेजर अजीत चौधरी यांनी सांगितलं आहे की, जेसीबी चालक टोलनाक्यावरुन जात होता. टोल कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे मागितले असता ते शिव्या देऊ लागला. त्याने जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही टोल बूथ तोडले. तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचंही नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या चालकाचा शोध घेत आहेत.


गेल्या आठवड्यात हापूरमध्ये एका कार चालकाने टोल न भरण्यासाठी टोल कर्मचाऱ्यावर धाव घेतली होती. ही भीषण घटना चिजारसी येथील टोल बूथच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हिडिओमध्ये टोल कर्मचारी वाहनाच्या लेनवरून चालत असताना वेगवान कारने मागून धडक दिली. वाहनाच्या वेगामुळे टोल कर्मचारी हवेत फेकला गेला आणि गाडीच्या बोनेटवर कोसळला.