एकटेपणाच्या भावनेने माजी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर
व्यासपीठावरून संवाद साधतेवेळीच....
मुंबई : राजकारणाच्या विश्वाविषयी कोणतीच शाश्वती देता येत नाही. या पटलावर कधी कोण, कशी खेळी खेळेत आणि विरोधकांवर मात करेल याचंही चित्र स्पष्ट नसतं. चाणक्यनिती म्हणा, किंवा मग रणनिती या विश्वात कधी कोणाला घाम फोडेल आणि कोणाला रडायलाही भाग पाडेल हेसुद्धा सांगता येणं तसं कठीणच. अशा या राजकारणाता महाराष्ट्राच अनेकांनाच अुनभव येत असताना तिथे कर्नाटकातही याबाबतची प्रचिती आली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ आणि त्यांचे अश्रू बरंच काही सांगून गेले. मांड्या येथे एका सभेला संबोधित करतानाच त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि कुमारस्वामी रडू लागले. या मतदारसंघात आपल्या मुलाचा पराभव झाल्याची बाब अधोरेखित करत जनतेने त्यांना एकटं पाडलं असल्याची भावना व्यक्त करत ते भावूक झाले.
५ डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या धर्तीवर ते येथे जेडीएसचे उमेदवार बी.एल.राजू यांच्यासाठी प्रचार करत होते. 'मला हे राजकारणच नको. मला मुख्यमंत्रीपदही नको. मला फक्त तुमचं (जनतेचं) प्रेम हवं आहे. माझ्या मुलाचा पराभव का झाला हे मला ठाऊक नाही. त्याने मांड्या येथून निवडणूक लढावी असंही मला वाटत नव्हतं. पण, त्याने निवडणूक येथूनच लढावी असं माझ्या इथल्या जवळच्या लोकांना वाटत होतं. त्यांनीच माझ्या मुलाला पाठिंबा दिला नाही. मला याच गोष्टीचं अत्यंत दु:ख होत आहे', असं म्हणताना कुमारस्वामी यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले
निवडणुकीत पराभूत होण्याचं दु:ख नसल्याचं म्हणत कुमारस्वामी यांनी आपल्या लोकांनीच आपल्याला एकटं पाडल्याची खंत यावेळी व्यक्त केली. राजकारणाची खेळी करणाऱ्या नेतेमंडळींचं हे हळवं रुप गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात अनेकदा पाहायला मिळालं आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांचा मुलगा आणि एच.डी. देवेगौडा यांचा नातू निखील हे मांड्या मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि कन्नड अभिनेत्री सुमलता अंबरीश यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं.