कर्नाटकात भाजप, काँग्रेस नाही तर या पक्षाकडे सत्तेच्या चाव्या
कर्नाटकात हा पक्ष ठरणार किंग मेकर...
मुंबई : आज कर्नाटकमध्ये 222 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. विविध प्रसार माध्यमांच्या एक्जिट पोलनुसार कर्नाटकात कोणालाच बहुमत मिळणार नसल्याची शक्यता आहे. राज्यात त्रिशंकू अवस्थेची शक्यता आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या हातात असलेलं राज्य निसटतांना दिसत आहे. काँग्रेसला जर बहुमत मिळालं नाही तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल. या निवडणुकीच्या निकालांचा थेट परिणाम आगामी 2019 मधील निवडणुकांवर देखील होणार आहे. काँग्रेस हा कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष असेल तर दुसऱ्या स्थानावर भाजप हा पक्ष असेल. पण तिसऱ्या स्थानावर असलेला जेडीएस हा पक्ष या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
जर काँग्रेस किंवा भाजप बहुमतापर्यंत पोहचू शकला नाही तर सत्ता स्थापनेत जेडीएस मोठी भूमिका बजावू शकतो. त्यामुळे सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे राहण्याची शक्यता आहे.
टाईम्स नाऊ-वीएमआरच्या एक्जिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेसचा 90 ते103 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 80-93 जागा मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या स्थानावर जेडीएसला 31-39 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2 ते 4 जागा अपक्षांना मिळण्याची शक्यता आहे.
आजतकच्या एक्जिट पोलनुसार काँग्रेसला - 106 ते 118 जागा, भाजपला - 79 ते 92 जागा तर जेडीएस- 22 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे देखील त्रिशंकू स्थिती दिसत आहे. राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्याचं एक्जिट पोलमध्ये दिसत आहे.
ओपिनियन पोलमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत नाही
कर्नाटक निवडणुकीत एक्जिट पोलच्या आधी ओपिनियन पोलमध्ये देखील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं म्हटलं होतं. काही ओपिनियन पोल भाजपच्या बाजुने देखील आहे. राजेश्वरी आणि जयनगरमध्ये नंतर मतदान होणार आहे. 21 राज्यांमध्ये भाजपची आणि युतीची सत्ता आहे. कर्नाटकसह काँग्रेस फक्त 4 राज्यांमध्ये सत्तेत आहे. भाजपचा विजय झाला तर भाजपची 22 राज्यांमध्ये सत्ता असेल तर काँग्रेस 3 राज्यांमध्ये सत्तेत असेल.