`झी न्यूज`चे निर्भय वार्तांकन दहशतवाद्यांना झोंबले; `जैश`च्या मुखपत्रातून सुधीर चौधरींवर टीका
झी न्यूज खोट्या गोष्टी मांडून भारतीय जनतेमध्ये पाकिस्तानविषयी गैरसमज पसरवत आहे.
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 'झी न्यूज'ने केलेल्या निर्भय आणि आक्रमक वार्तांकनाचे पडसाद पाकिस्तानमध्येही उमटले आहेत. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ऑनलाईन मुखपत्रातून 'झी न्यूज' वाहिनी आणि संपादक सुधीर चौधरी यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. अल कलाम हे जैश-ए-मोहम्मदचे ऑनलाईन नियतकालिक आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात पुलवामा हल्ल्यानंतर 'झी न्यूज'ने केलेल्या वार्तांकनावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. झी न्यूज खोट्या गोष्टी मांडून भारतीय जनतेमध्ये पाकिस्तानविषयी गैरसमज पसरवत आहे. तसेच पुलवामा हल्ल्यानंतर 'झी न्यूज'कडून युद्धासाठी उद्युक्त करणारी भाषा वापरली जात असल्याचेही 'अल कलाम'मध्ये नमूद करण्यात आले आहे.
'भारतीय प्रसारमाध्यमांचा नकारात्मक आणि निषेधार्ह चेहरा' या मथळ्याखाली लिहलेल्या या लेखात सुधीर चौधरी यांच्या Daily News and Analysis (डीएनए) या प्राईम टाईम शोचा ही उल्लेख आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्येवर युद्ध हा एकमेव उपाय असल्याच्या चौधरी यांच्या भूमिकेवर जैशने टीका केली आहे. तसेच बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचे असणारे योगदान व पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील चळवळीचे चौधरी यांच्याकडून समर्थन केले जाते. ते भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या विघटनावर भर द्यावा, या विचाराचे असल्याचेही 'जैश'च्या मुखपत्रात म्हटले आहे.
ही सगळी परिस्थिती पाहता झी न्यूजच्या निर्भय वार्तांकनामुळे पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद संघटनेवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या काळात 'झी न्यूज'ने सातत्याने राष्ट्रवादाच्या भावनेतून परखड वार्तांकन करण्याचा सपाटा लावला होता. हाच निर्भयपणा दहशतवाद्यांना झोंबला असावा. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा जैशचा म्होरक्या मसूद अजहर झी न्यूजला इतका का घाबरला असेल?, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.