Crime News : राजधानी दिल्लीतून (Delhi Crime) आतापर्यंत सर्वात मोठ्या दरोड्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीत एका ज्वेलर्स शॉपमध्ये पडलेल्या दरोड्यात चोरट्यांनी तब्बल 25 कोटी रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. या चोरीमुळे पोलिसांच्याही (Delhi Police) पायाखालची जमीन सरकली आहे. दुकानाच्या मालकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील अत्यंत श्रीमंत अशा जंगपुराजवळ असलेल्या भोगलमध्ये 25 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. भोगल परिसरातील उमरावसिंग ज्वेलर्सच्या शोरूमचे छत व भिंत अज्ञात चोरट्यांनी उचकटून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच निजामुद्दीन पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दुकानात आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत.


उमराव ज्वेलर्स शोरूम फोडून चोरट्यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने पळवले आहेत. बऱ्याच दिवसांच्या पूर्ण नियोजनानंतर चोरट्याने ज्वेलरी शोरूमच्या छताला आणि भिंतीला छिद्रे पाडून दागिने ठेवलेला स्ट्राँग रूम गाठली. धक्कादायक बाब म्हणजे आजूबाजूच्या दुकानांमध्ये कोणतीही संशयास्पद कृती आढळलेली नाही. सोमवारी ज्वेलरी शोरूममध्ये सुट्टी असल्याने ते बंद होते. मंगळवारी सकाळी शोरूम उघडल्यानंतर ही बाब उघडकीस आली.


"आम्ही रविवारी दुकान बंद केले होते आणि मंगळवारी आम्ही ते उघडले. तेव्हा आम्ही पाहिले की संपूर्ण दुकानात धूळ होती आणि स्ट्राँग रूमच्या भिंतीला छिद्र पडले होते. आम्हाला वाटते की चोरांनी सर्व काही लंपास केले आहे. सुमारे 20-25 कोटी रुपयांचे दागिने होते. ते टेरेसवरून आत आले. सीसीटीव्हीसह सर्व काही खराब झाले आहे. तपास सुरू आहे," असे उमरावसिंग ज्वेलर्सचे मालक संजीव जैन यांनी सांगितले.



कशी झाली चोरी?


शोरूममध्ये चोरटे कसे घुसले हा मोठा प्रश्न संजीव जैन यांनाही पडला आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, चोरटे शोरूमला लागून असलेल्या जिन्यांवरून छतावर पोहोचले. त्यानंतर चोरट्यांनी छताला भगदाड पाडून आत प्रवेश केला. चोरीनंतरच्या या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात छताला भगदाड पडलेलं दिसत आहे. मात्र, या घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेले नाही.