रांची : झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी या महिलेवर गावाची बदनामी करण्याचा आरोप लावलाय. त्यानंतर या महिलेला पंचायतीच्या घरात आश्रय घ्यावा लागलाय. सिमडेगा जिल्हा प्रशासनानं स्थानिक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. खाद्य सुरक्षेसंबंधी मुद्यांवर काम करणाऱ्या एका संघटनेनं १५ ऑक्टोबर रोजी ही बातमी समोर आणल्यानंतर हे प्रकरण जगासमोर आलं होतं. 


नेमकं काय घडलं होतं... 


झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागला होता. 


अवघ्या ११ वर्षांच्या संतोष कुमारीच्या पोटात गेल्या कित्येक दिवसांपासून अण्णाचा एक कणही गेला नव्हता. संतोष आपल्या कुटुंबीयांसोबत सिमडेगा जिल्ह्यातील जलडेगा प्रखंडातील कारीमाटी या गावात राहत होती.


संतोषची आई कोयली देवीकडे बीपीएल कार्ड होतं... परंतु, रेशनिंग दुकानदारानं हे कार्ड आधारला लिंक नसल्याचं सांगत त्यांच्या कार्डावर अन्नधान्य नाकारलं... आणि त्यांनी रेशनिंग कार्डही रद्द करून टाकलं. यामुळे त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून अन्न मिळणंही दुरापास्त झालं होतं, अशी माहिती कोयली देवींनी दिली होती. 


गरिबी रेषेच्या खालच्या स्तरावर असणाऱ्या संतोषच्या कुटुंबीयांपैंकी कुणाकडेही नोकरी नाही... संतोषची आई जे घरकाम करते त्यावरच त्यांचं घर चालतं... वडील मानसिकरित्या आजारी आहेत... त्यामुळे आईही कुठे जाऊ शकत नव्हती... अशावेळी संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय अन्न सुरक्षेद्वारे मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून होतं... तेही नाकारलं गेल्यावर 'भात... भात' करत भूकेनं आपला जीव सोडणाऱ्या संतोषला तिची आई पाहत होती... परंतु, तिला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकली नाही.