मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात; विजेच्या झटक्यामुळे चौघांचा मृत्यू
Muharram Procession Accident : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी मिरवणूक काढली जात असताना एक ताजिया एका हाय टेंशनच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jharkhand Accident : देशभरात मोहरम निमित्ताने (Muharram procession) मुस्लीम बांधवांकडून मिरवणूक काढल्या जात आहेत. मात्र मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूतांच्या मिरवणुकीमुळे एक मोठा अपघात घडलाय. मोहरमच्या मिरवणुकीत झारखंडमधील बोकारो (Jharkhand’s Bokaro) येथे शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. बोकारो येथे हाय टेंशन वायरमुळे एकूण 13 जण गंभीररीत्या भाजले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ताजिया उचलत असताना 11,000 व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
बोकारोच्या बर्मो भागातील खेतको येथे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोहरममध्ये सर्वजण ताजिया घेऊन जात असताना 11000 व्होल्टच्या वायरच्या संपर्कात आले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, ताजिया उचलत असताना वरून जाणारी 11,000 हाय टेंशन लाईन ताजियामध्ये अडकली. त्यामुळे ताजियाच्या मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेनंतर घटनास्थळी घबराट पसरली होती. अपघातानंतर, सर्व जखमींना तातडीने बोकारो थर्मल येथील डीव्हीसी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बोकारो येथे हलवण्यात आले.
मात्र जखमींना बोकारो येथील रुग्णालयात हलवण्यात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समजताच नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने बोकारो बीजीएच रुग्णालयात पोहोचला. सर्वांवर येथे उपचार सुरू असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले आहेत.
पहाटे साडेपाचच्या सुमारास ताजियाला उपदरगाह टोला येथे भेटीसाठी नेले जात होते. ताजिया उचलताना तो वरून जाणाऱ्या 11 हजारांच्या हाय टेंशन वायरमध्ये अडकला. त्यानंतर मोठा आवाज झाला आणि अनेक जण गंभीररित्या भाजले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आसिफ रझा (21 वर्षे), इनामुल रब (35 वर्षे), गुलाम हुसेन (18 वर्षे), साजिद अन्सारी (18 वर्षे) यांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी पेटरवार शैलेंद्र चौरसिया घटनास्थळी पोहोचले. ताजियामध्ये 11,000 हाय टेंशन वायर तुटल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात एकूण 13 जण गंभीररित्या भाजले. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. सात जणांवर उपचार सुरू असून दोन जणांना घरी पाठवण्यात आले आहे.