श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शाळेत बुधवारी दुपारी स्फोट झाला. या स्फोटात तब्बल १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. येथील नरबळ परिसरातील फलाई-ए-मिल्लत या खासगी शाळेत हा प्रकार घडला. या स्फोटाचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहीजणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर गंभीर जखमी असलेल्या मुलांना उपचारांसाठी श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला. सध्या पोलीसांकडून स्फोटाचे स्वरूप आणि कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरु आहे. 




या स्फोटाचा संबंध दहशतवादी कारवायांशी असण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. बुधवारी सकाळी बडगाम परिसरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तत्पूर्वी मंगळवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. गेल्या काही दिवसांत लष्कराने मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे एन्काउन्टर केले आहेत. यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घटल्याची चर्चा आहे.