श्रीनगर: काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. येथील किलोरा गावात काल (शुक्रवारी) रात्रीपासून ही चकमक सुरु होती. काहीवेळापूर्वीच ही चकमक थांबली असून पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबा संघटनेचे होते. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमक सुरु आहे. मागील ७२ तासांमध्ये ९ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.


किलुरा भागात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागांमध्ये शोध मोहिम राबवण्यात आली. या शोध मोहिमेबाबत दहशतवाद्यांना समजताच त्यांच्याकडूनही गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला उत्तर देताना सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले.