पुलवामातील चकमकीत भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्या २४ तासांत भारतीय जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाल्याची ही दुसरी घटना
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आज पहाटेपासून ही चकमक सुरु होती. गेल्या २४ तासांत भारतीय जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाल्याची ही दुसरी घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यादृष्टीने राजपोरा परिसरात शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. याठिकाणी अजूनही चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय. याशिवाय, हनजान परिसरातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी बांदीपोरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर तोयबाच्या एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले होते. इशफाक युसुफ वाणी असे त्याचे नाव असून तो पुलवामा येथील रहिवासी होता. पाच महिन्यांपूर्वी तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. इशफाकच्या अंत्यविधीला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर दक्षिण काश्मीरमधील काही भागांमध्ये तणावही निर्माण झाला होता.