जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या; भाजप नेत्याची मागणी
मोदींनी अनुच्छेद ३७० चा घोळ निस्तरला आहे.
नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार हंसराज हंस यांनी केली आहे. ते रविवारी जेएनयू विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द झाल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.
त्यांनी म्हटले की, सर्वजण शांततेत राहावेत, एवढीच प्रार्थना करा. गोळीबार आणि बॉम्बफेक होऊ नये, या मताचा मी आहे. आपल्या पूर्वजांनी काही चुका केल्या. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत, असे हंसराज हंस यांनी म्हटले.
यानंतर त्यांनी उपस्थितांना जेएनयूमधील 'जे' या आद्याक्षराचा अर्थ विचारला. तेव्हा सगळ्यांना एका सुरात 'जवाहरलाल' असे उत्तर दिले. यावर हंसराज हंस यांनी त्यांच्यामुळेच अनुच्छेद ३७० चा घोळ निर्माण झाल्याचे म्हटले. मात्र, आता मोदींनी हा घोळ निस्तरला आहे. त्यामुळे आता 'जेएनयू'चे नाव बदलून 'एमएनयू' असे करावे. मोदींच्या नावावरही काहीतरी असायला पाहिजे, असे हंसराज हंस यांनी सांगितले.
२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जेएनयू सरकारविरोधी घडामोडींचा केंद्रबिंदू राहिले आहे. काही वर्षांपूर्वी जेएनयूत देशविरोधी घोषणबाजी झाल्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन विद्यार्थी संघटनेचा कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्यासह अनेकांवर कारवाई झाली होती. तेव्हापासून जेएनयू विद्यापीठ सातत्याने उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या टीकेचे केंद्र राहिले आहे.