`जेएनयू`मधल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद, अमित शाहंचे चौकशीचे आदेश
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी तुंबळ हाणामारी झाली.
नवी दिल्ली : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यावर हल्ला करण्यात आला. बुरखाधारी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करुन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप, आयेषी घोष हिनं केला. या हल्ल्यात शिक्षक आणि सुमारे वीस विद्यार्थी जखमी झालेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनच हा हल्ला करण्यात आला असून, पोलिसांनी यात बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही, स्टुडंट युनियनकडून करण्यात आला.
दरम्यान जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच, जेएनयू कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमा झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप, स्टुडंट युनियननं केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यातल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली.
जेएनयूतील फीवाढीविरोधात स्टुडंट युनियकडून आंदोलन सुरू होतं. यावेळी ही घटना घडलीय. दरम्यान जेएनयूचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून, मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिलेत. तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या हल्ल्याबाबत विद्यापीठाकडे तातडीनं अहवाल मागवलाय.
जेएनयूमधल्या या राड्यानंतर दिल्ली पोलिसांनी विद्यापिठात फ्लॅग मार्च काढत पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलीस गो बॅक अशी जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई-पुण्यात निदर्शनं
जेएनयूमधल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले आहेत. मुंबई-पुण्यातही या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं रात्रीच्या सुमारास कँडलमार्च काढम्यात आला. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील फिल्म अँन्ड टेल्व्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या सुमारास मोर्चा काढला. कोलकाता, अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्येही निदर्शनं करण्यात आली.
नेत्यांकडून चौकशीची मागणी
जेएनयूमधल्या हिंसाचारानंतर तिथे गेलेले स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या गुंडांनी आपल्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप, योगेंद्र यादव यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रुरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांनी तातडीने ही हिंसा थांबावी आणि शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल?, असा प्रश्न केजरीवील यांनी ट्विटद्वारे केला आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एम्समध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. तर दिल्लीतले भाजप खासदार मनोज तिवारी आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
जेएनयूचे विद्यार्थी तसंच शिक्षक आणि दिल्ली पोलिसांचे पीआरओ एम एस रंधावा यांच्यात मध्यरात्री दिल्ली पोलीस मुख्यालयात बैठक झाली. जखमींना वैद्यकीय सहाय्य आणि हल्लेखोरांना अटक करण्याची मुख्यमागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.