नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून लवकरच कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. सूत्रांकडून याची माहिती मिळाली. आरोपपत्रामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे स्नातक राहिलेल्या उमर खालिद, कन्हैया कुमार आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह इतरही काही जणांची नावे असण्याची शक्यता आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपपत्र सध्या सरकारी वकिलांकडे पाठविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी दिली गेली, त्यावेळी तिथे अनेक जणांनी आपल्या कॅमेऱ्यातून शूटिंग केले होते. त्याचे व्हिडिओ सीबीआयला मिळाले आहेत. ते तपासणीसाठी सीबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. जवळपास सर्व फुटेज खरे असल्याची माहिती अहवालातून पुढे आली. त्याचबरोबर घटना घडली, त्यावेळी तिथे अनेक स्नातक उपस्थित होते. त्यांचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे. फेसबुक पोस्टचाही पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अजून ३० जण संशयास्पद आढळले होते. पण त्यांच्याविरुद्ध पुरावे हाती लागले नव्हते. जेएनयू प्रशासन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, सुरक्षारक्षक हे सुद्धा साक्षीदार म्हणून कोर्टापुढे उभे केले जाणार आहेत.


अफजल गुरू याच्या फाशीच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीच देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळीच दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना अटक केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.