`जेएनयू`वर पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता, अभाविपला पराभवाचा धक्का
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या विचारांची सत्ता आली आहे.
नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या विचारांची सत्ता आली आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे. चारही जागा जेएनयूने पटकावल्या आहेत. दरम्यान, निकाल जाहीर होताच ‘लाल सलाम’च्या घोषणा देत डाव्या संयुक्त आघाडीने विद्यापीठ परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान, या निवडणुकीविरोधात जेएनयू विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यापीठाला निकाल राखून ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर, सहा सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने निकाल घोषीत करण्याची परवानगी दिली. त्यानंतर निकालांची घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीत एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ, डीएसएफ अशी डाव्याची संयुक्त आघाडी झाली होती. तर विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होती. या दुरंगी लढतीने विद्यापीठ आवारातील वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले होते. मात्र, पुन्हा एकदा जेएनयूवर 'लाल सलाम'ची सत्ता आली असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) आयशी घोषची अध्यक्षपदी निवड झाली आहे. पश्चिम बंगालच्या आयशीला २३१३ मते मिळाली, आयशीने अभाविपच्या मनीष जांगीडचा पराभव केला. मनीषला ११२८ मते मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्राच्या एका तरुणानेही विजय मिळवला आहे. नागपूरच्या साकेत मून याची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
तर डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशनच्या (डीएसएफ) साकेतने अभाविपच्या श्रुती अग्निहोत्रीचा पराभव केला. साकेतला सर्वाधिक ३३६५ मते मिळाली. तर ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (एआयएसएफ) सतिश चंद्र यादवची सचिवपदी निवड झाली. सतिशला २५१८ मते मिळाली. तर, ३२९५ मते मिळवून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएसएफ) मोहम्मद दानिशने सहसचिवपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.