Experiance Letter च्या बदल्यात 3 महिन्यांचा पगार द्या; कंपनीची अजब मागणी ऐकताच कर्मचाऱ्यावर डोकं धरायची वेळ
कर्मचाऱ्यांना समजतात तरी काय? Experiance Letter च्या बदल्यात कंपनीनं मागितला 3 महिन्यांचा पगार; कोणत्या कंपनीत सुरुय मनमानी कारभार?
Job News : नोकरी करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे हे एखाद्या चांगल्या संधीकडे लागलेले असतात. नोकरी, पगार, नोकरी देणारी आस्थापनं, त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात. कित्येकदा कर्मचाऱ्यांकडून कंपन्या त्यांच्या कामात 100 टक्के समर्पकतेची अपेक्षा ठेवतात आणि कर्मचारीसुद्धा स्वत:ला कामामध्ये झोकून देतात. पण, त्यांच्या हाती मात्र अनेकदा निराशा लागते. नोकरी बदलण्याच्या वेळी हे बदल दिसू लागतात , ज्यामुळं कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होतं ही बाब नाकारता येत नाही.
सध्या सोशल मीडियावर नोकरीशीच संबंधित एक विचित्र बातमी चर्चेचा विषय ठरत आहे. जिथं कर्मचाऱ्यानं नोकरीच्या ठिकाणी राजीनामा देताच दुसऱ्याच दिवशी त्याला चुकीच्या पद्धतीनं नोकरीवरून हटवण्यात आलं. इतकंच नव्हे तर, कंपनीनं कर्मचाऱ्यावर चुकीच्या पद्धतीनं नोकरी सोडण्याचा आरोप करत Experience Letter देण्यासाठी कर्मचाऱ्याकडूनच तीन महिन्याच्या वेतनाची मागणी केली आहे.
Reddit वर या व्यक्तीनं आपला अनुभव सांगताना चेन्नईमध्ये नोकरी शोधण्यासाठी इतरांकडे मदतही माहितलं. Randy 31599 या नावानं अकाऊंट असणाऱ्या या युजरनं आपल्यावर नोकरीच्या ठिकाणी प्रचंड दबाव असल्याचं सांगत त्यामुळं आरोग्याच्या समस्याही उदभवल्याचं कारण पुढे करत राजीनामा दिल्याचं सांगितलं. कंपनीकडे या कर्मचाऱ्यानं राजीनामा सादर करताना आपल्याला महिन्याभराच्या काळात नोकरीवरून मुक्त करावं अशीही मागणी केली होती. पण, त्याचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्यामुळं त्याच कंपनीत आजारपणातही या कर्मचाऱ्याला काम करत रहावं लागलं.
हेसुद्धा वाचा : कॉलरला धरून अभिनेत्याला मारहाण; सारा गाव गोळा झालेला आणि...; कोण आहे हा सेलिब्रिटी?
नोकरीच्या ठिकाणी मिळणारा पगार समाधानकारक असूनही कामाचा वाढता ताण मात्र सहन होण्यापलीकडे असल्याचं सांगत टीमनं आपल्याला फार सहकार्य दिलं नसल्याची बाब त्यानं आपल्या पोस्टमध्ये अधोरेखित केली. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण पुढे करत आपण 1 महिन्यातच नोकरीतून मुक्त होण्याची मागणी केली. पण, सीईओनं हे कारण जाणत असून काम करणं सुरूच ठेवण्याची सूचना मला केली असं सांगताना पुढं झालेल्या कार अपघातानंतरही राजीनामा कंपनीनं दुसऱ्यांदा स्वीकारला नाही उलटपक्षी त्याला दुसऱ्याच दिवशी कामावरून काढून टाकलं.
BGV प्रक्रियेदरम्यान सदर कर्मचाऱ्यानं अयोग्यरित्या नोकरीचा राजीनामा दिल्याचं कारण कंपनीनं पुढे केलं. इतक्यावरच न थांबता त्यांनी अनुभवाचं प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कर्मचाऱ्याकडूनच तीन महिन्याचं वेतन मागितलं. दरम्यान या कर्मचाऱ्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला या प्रकरणी कायदेशीर पावलं उचलत श्रम मंत्रालयाकडे याविषयीची तक्रार करण्याचा सल्ला दिला.