मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम  अभिनेते सय्यद बद्ल उल हसन खान बहादूर उर्फ पप्पू पॉलिस्टर यांचे मंगळवारी निधन झाले. मालिका, रंगभूमी, चित्रपट आणि जाहिराती अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी तब्बल २५ वर्षे मुशाफिरी केली. १९९० साली आलेल्या 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात त्यांनी मैसूरच्या महाराजांची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच त्यांना नृत्यातही विशेष गती होती. ते एक उत्कृष्ट शास्त्रीय नर्तक होते. उर्दू, भोजपुरी, इंग्रजी, अवधी आणि अरबी भाषेतील कलाकृतींमध्येही त्यांनी काम केले होते. ते अवधचे नवाब वाजिद अली शहा यांचे दहावे वंशज होते. 


हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना पप्पू पॉलिस्टर या टोपणनावाने ओळखले जात असे. 'जोधा-अकबर', 'फिर भी दिल है हिंदुस्थानी', 'मन', 'खोया खोया चांद', 'बादल' 'दर्मियान', 'फूल और अंगार', 'इत्तेफाक और धुंध' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिल्या. याशिवाय, छोट्या पडद्यावरील 'प्रतिज्ञा', 'ये प्यार न होगा कम', 'आयाराम गयाराम', 'जय मां वैष्णो देवी', 'जय हनुमान', 'ओम नम: शिवाय' या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.