जॉन्सन एन्ड जॉन्सन `बेबी केअर शॅम्पू`मुळे कॅन्सरचा धोका, बाजारातून परत मागवले
`जॉन्सन एन्ड जॉन्सन` ही कंपनी हिमाचल प्रदेशात `बद्दी`मध्ये अनेक उत्पादन तयार करते
जयपूर : प्रत्येक आई-वडील आपलं बाळ सुदृढ राहावं आणि प्रत्येक धोक्यापासून दूर राहावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. यासाठी आपल्या खिशाला देता येईल तेवढा ताण देऊन जगातली चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या बाळासाठी उपलब्ध करून देतात. यासाठी ते प्रत्येक प्रोडक्टची निवड विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करतात. पण, तुम्ही ज्या कंपन्यांवर विश्वास टाकून त्यांचे प्रोडक्ट खरेदी करत आहात त्या कंपन्या तुमचा विश्वासघात तर करत नाहीत ना? लहान बाळांसाठीच्या प्रोडक्टससाठी ओळखल्या जाणाऱ्या 'जॉन्सन एन्ड जॉन्सन' ही कंपनी पुन्हा एकदा वादात अडकलीय.
'जॉन्सन एन्ड जॉन्सन' ही कंपनी हिमाचल प्रदेशात 'बद्दी'मध्ये अनेक उत्पादन तयार करते. या कंपनीच्या बेबी शॅम्पूच्या तसापणीत काही हानिकारक तत्व आढळलेत. या बेबी शॅम्पूचा बॅच क्रमांक - बीबी ५८१७७ आणि बीबी ५८२०४ असा आहे.
यानंतर, राजस्थानमधील सर्व ड्रग्ज कंट्रोल अधिकाऱ्यांना या ड्रग्ज बुलेटिनबद्दल माहिती देण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी शॅम्पूच्या दोन्ही बॅच मानकांवर फोल ठरल्यात. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही उत्पादनं हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे कंपनीच्या या उत्पादनांची विक्री रोखत ते बाजारातून परत मागवण्यात आलेत.
'जॉन्सन एन्ड जॉन्सन'च्या 'बेबी केअर शॅम्पू'मध्ये हानिकारक असे फार्मेल्डिहाइड असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय. फार्मेल्डिहाइडमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बीबी ५८१७७ आणि बीबी ५८२०४ या बॅचचा बेबी शॅम्पू बाजारात विक्रीसाठी जाऊ नये आणि त्याला ताबडतोब बाजारातून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२०१८ मध्ये अमेरिकेत काही महिलांमध्ये जॉन्सन एन्ड जॉन्सन बेबी पावडरमुळे ओवेरियन (गर्भाशय) कॅन्सरचे लक्षण आढळले होते. महिलांचे दावे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं २२ पीडित महिलांना ४.६९ अरब डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
त्यापूर्वी १९८२ मध्येही जॉन्सन एन्ड जॉन्सनच्या एका औषधामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता.