Wedding Rituals : विवाहसोहळा.... नुसता उल्लेख जरी झाला तरीही समोर एक आनंदी चित्र उभं राहतं. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करु पाहणाऱ्या वधु-वरांसोबतच हा सोहळा प्रत्येकासाठी खास असतो. कुठं दूरचे नातेवाीक वेळात वेळ काढत या समारंभासाठी येतात तर, कुठे नकळतच एखादी व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेऊन जाते. कितीही नाकारलं तरीही लग्नसोहळा हा त्या दोन व्यक्तींचा असला तरीही प्रत्येकजण त्याला आपआपल्या परीनं जगत असतो. (Joota Chupai Rasam Why Brides Sisters Hide Groom Shoes in Wedding )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणताही प्रांत असो, कोणताही समुदाय असो सर्व परंपरा आणि प्रथांचं पालन करत, अगदी सवडीनं आणि तितक्याच आनंदानं दोन व्यक्तींच्या नव्या आयुष्याची सुरुवात करून दिली जाते. अशा या विवाहसोहळ्यांमध्ये एक प्रथा कमालीची गाजते आणि यावेळी सर्वजण एकच कल्लाही करतात. ही प्रथा म्हणण्यापेक्षा एक धमाल क्षणच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही प्रथा म्हणजे नवरदेवाचे बूट लपवण्याची. तुमच्याही लग्नात या क्षणी एकच गोंधळ झालेला आठवतोय का? बरं, लग्न झालं नसेल तर तुम्ही ओळखीच्या कोणा व्यक्तीच्या लग्नात किंवा मग चित्रपटात तरी हा क्षण पाहिलाच असेल. पण, कधी ही प्रथा आहे की असंच आपलं सगळेजण करतात म्हणून आम्हीही मजा करतो? हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? 


फक्त बूटच का चोरतात? 


आता तुम्ही म्हणाल, की नवरदेवाचे बूटच का चोरतात? फेटा, तलवार किंवा तत्सम गोष्टी का लपवल्या जात नाहीत? तर, बूटांवरून व्यक्तीचे स्वभावविशेष लक्षात येतात. म्हणूनच ते लपवले जातात. फेटा, तलवार किंवा इतर कोणतीही गोष्ट नवरदेव किंवा कोणाही व्यक्तीच्या आत्मसन्मानाला दुखावू शकते. त्यामुळं या गोष्टी लपवल्या जात नाहीत. 


या प्रथेमागं आहे खास कारण... 


सहसा नवरदेव जेव्हा विवाह विधींसाठी व्यासपीठावर किंवा मंडपात येतो तेव्हा मुलीकडची मंडळी आणि विशेष म्हणजे नवरीच्या बहिणी त्याच्या बूटांवर डोळा ठेवून असतात. संधी मिळताच त्या सर्वजणी गुपचूपपणे हे बूट पळवतात आणि लपवून ठेवतात. यानंतर नवरदेवाला ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो आणि मग सुरु होते देवाणघेवाणीची चर्चा. इतके रुपये द्या आणि बूट घ्या, अशी मागणीही होते. बस्स... मग काय? या मेहुण्या नवरदेवाच्या नाकीनऊ आणतात. इतक्या की, मनाजोगे पैसे मिळत नाहीत तोवर त्या बूट परतच करत नाहीत. तुम्हाला माहितीये का, ही प्रथा धमाल- मस्तीसाठीच नव्हे तर एका खास कारणामुळं पार पाडली जाते. 


काय आहे या प्रथेमागचं कारण? 


असं म्हटलं जातं की, या प्रथेच्या माध्यमातून नवरदेवाचा समजुतदारपणा लगेचच लक्षात येतो. त्याच्या संयमी वृत्तीचा अंदाज येतो. कोणालाही न दुखावता तो बूट नेमके कसे परत मिळवतो, हे तिथं लक्षात येतं. 


हेसुद्धा पाहा : या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच 


नवरदेवानं जर, मेहुण्यांच्या मागण्या (त्यांनी बुटांच्या बदल्यात मागितलेली रक्कम) एका क्षणात मान्य केल्यास तो अतिशय भोळा असल्याचं समजलं जातं. सर्वांनाच आनंदात ठेवण्याचा त्याचा हेतू त्या क्षणी लक्षात येतो. तर, जो नवरदेव अतिशय हुशारीनं कोणाचंही मन न दुखावता बूट परत मिळवतो आणि जास्त रक्कमही मोजत नाही अशा व्यक्तीला चाणाक्ष समजलं जातं. काय मग? आता कारण कळलं ना? इथून पुढं कोणत्याही लग्नसमारंभात तुम्हाला ही प्रथा पाहण्याची संधी मिळाली तर, याचा पुरेपूर आनंद घ्या. कारण, यातून नवरदेव कसा आहे हेच तुम्हालाही कळणार आहे.