दीपक मिश्रा होणार देशाचे मुख्य न्यायाधीश
सरकारनं मंगळवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना पुढचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्तीला मंजुरी दिलीय.
नवी दिल्ली : सरकारनं मंगळवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना पुढचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्तीला मंजुरी दिलीय.
२७ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सद्य न्यायमूर्ती जे एस केहर यांच्या जागा दीपक मिश्रा घेणार आहेत. न्यायमूर्ती केहर यांनी मुख्य न्यायाधीश पदावर आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती मिश्रा यांच्या नावाची शिफारस केली होती.
न्यायमूर्ती मिश्रा भारताचे ४५ वे मुख्य न्यायाधीश असतील. न्या. मिश्रा १४ महिन्यांपर्यंत आपल्या पदावर राहतील. याच कारण म्हणजे, २ ऑक्टोबर २०१८ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
न्यायमूर्ती मिश्रा देशाच्या मुख्य न्यायाधीश पदी विराजमान होणारे ओडिशाचे तिसरे व्यक्ती ठरणार आहेत. त्यांच्यापूर्वी ओडिशातून न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) रंगनाथ मिश्रा आणि न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी बी पटनायक या पदावर विराजमान झाले होते.
न्यायमूर्ती मिश्रा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन याच्या मृत्यूदंड थांबवण्यासाठी केलेली याचिका फेटाळणाऱ्या पीठाचे तसंच निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणी दोषींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवणाऱ्या पीठाचे अध्यक्षही होते.