अभिनेत्रींसाठी कोड नेम, चित्रपटासाठी शरिरसंबंधाची अट अन् दारु पिऊन...; कलाविश्वाचा भीतीदायक चेहरा समोर
Justice Hema Committee Report: कलाविश्वाचा खरा चेहरा... पाहून धडकी भरेल. असं नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या...
Justice Hema Committee Report: एकिकडे बदलापूर, कोलकाता (Kolkata rape and murder case) या आणि अशा अनेक घटना ताज्या असतानाच देशातील कलाविश्वामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांविरोधातील अत्याचार आणि तत्सम प्रकार उघडकीस येत असतानाच आता या सर्व प्रकरणांना नेमकी चालना कशी मिळते यासंदर्भातील माहिती नव्यानं समोर आली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे न्यायमूर्ति हेमा समितीचा अहवाल. (Justice Hema Committee Report)
न्यायमूर्ती हेमा समितीच्या वतीनं नुकताच एक अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये महिलांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनेक गंभीर प्रकरणांवर उजेड टाकण्यात आला आहे. या कलाजगतामध्ये उघडपणे महिला कलाकारांना चित्रपटांसोबतच शारीरिक संबंधांचीही ऑफर दिली जात असल्याचं म्हटलं गेलं आहे.
अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार अनेक महिलांवर त्यांना काम मिळण्यापूर्वीच तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. कलाविश्वामध्ये घडणारा हा सर्व प्रकार पाहता महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
न्यायमूर्ती हेमा समिती नेमकी का स्थापन करण्यात आली?
2019 मध्ये न्यायमूर्ती हेमा समिती स्थापन करण्यात आली होती. मल्याळम कलाविश्वामध्ये ज्या महिला अडचणींचा सामना करत आहेत, त्या महिलांच्या प्रश्न आणि अडचणींसंदर्भात निरीक्षण करत हा अहवाल सादर करण्यात आला. महिलांचं लैंगिक शोषण, अत्याचार आणि त्यांच्यासोबतचा गैरव्यवहार यासंदर्भातील अनेक मुद्द्यांवरील सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : 10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?
रात्री अपरात्री दारावर येतात आणि...
माहितीच्या अधिकाराअंतर्गत केंद्राकडे सोपवण्यात येणाऱ्या या अहवालाची प्रत समोर आली. जिथं दर पाच वर्षांनी सरकारकडे सोपवण्यात येणारी माहिती उघड झाली. सदर अहवालानुसार महिला कलाकारांना अनेक प्रसंगी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला असून, यामध्ये नशेच्या आहारी गेलेल्या अनेकांनी रात्री अपरात्री महिला कलाकारांच्या दारावत जात गोंधळ घातल्याच्या घटनांचाही उल्लेख आहे.
अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार या दाक्षिणात्य कलाजगतामध्ये महिला कलाकारांना चित्रपटासमवेत शारीरिक संबंधांची ऑफर देत या पातळीवर त्यांना तडजोडीस भाग पाडलं जात असेल. लैंगिक शोषणाचा बळी पडलेल्या अनेक महिलांनी भीतीपोटी पोलिसांमध्ये सदर प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. तर, काही महिला कलाकार तडजोडीसही तयार झाल्या. ज्यांनी ही तडजोड नाकारली त्यांना मात्र कामाला मुकावं लागलं अशा अनेक धक्कादायक घटना मल्याळम कलाविश्वात घडल्या आहेत.