नवी दिल्ली : रविवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील महागावच्या जोतिबा चौगुले शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये पाक सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे. हेलिकॉप्टरमधून त्यांचा मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आला आहे. ६ मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोतिबा चौगुले मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे राहणारे आहेत. २००९ साली चौगुले सैन्यदलात दाखल झाले होते. उद्या दुपारी महागाव गावात त्यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. 


रविवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. रात्री ९.३०च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.


पाकिस्तानने उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजर सेक्टरमधील निवासी भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. दुपारनंतर नियंत्रण रेषेला लागून आसलेल्या बखतूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.


पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे ग्रामस्त घरात लपून बसले आहेत. भारतीय सैन्य देखील या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुंछ आणि राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी उरी सेक्टरमध्ये देखील पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं होतं.