मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचार दौऱ्याला सुरूवात
मंदसौरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला
निनाद झारे, झी मीडिया, मध्यप्रदेश : मंदसौरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. अवघ्या ४८ तासाच्या आतच काँग्रेसचे मध्यप्रदेश प्रचारप्रमुख ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रचारदौऱ्याची सुरूवात आपल्या होमपीचवर म्हणजे गुणा-शिवपुरी लोकसभा मतदारसंघात केली आहे. अशोक नगर जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यांवर कडक उन्हात ज्योतिरादित्य शिंदे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले. तर ज्योतिरादित्य शिंदे सोबत प्रचार फेरीत सामील होऊन निवडणुकीची हवा कुठल्याबाजूला वाहतेय याचा अंदाज घेतला जातो.
दुपारी दीडची वेळ पारा ४६ अंशांवर गेलेला असतानाही ढोल ताशाच्या गजरात मशीदपुरचे गावकरी त्यांच्या खासदाराचं स्वागत करत आहेत. मध्यप्रदेश निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचे आधारस्तंभ असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंनी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. गावागावात जाऊन थेट लोकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अगदी गेल्याच महिन्यात त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक झाली आहे. दोन्ही ठिकाणी शिवराज सिंह चौहानांचं सारं मंत्रीमंडळ तळ ठोकून होतं. पण काही उपयोग झाला नाही. दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. आता गुणा-शिवपुरी मतदारसंघातले लोक ज्योतिरादित्यांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून बघत आहेत.
मसीदपूरनंतर पुढच्या गावात ज्योतिरादित्यांचा पुढच्या थांब्याला फटक्यांनी स्वागत होतं. गावासाठी मी काय काय केलं याची आठवण ज्योतिरादित्य करुन देतात. नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारालाच मत देण्याचा आग्रह धरतात. प्रचाराची पुढची चौक सभा राजपूरमध्ये होणार असते. वाटेत जिथे जिथे लोक भेटतात तिथे तिथे शिंदे थांबतात लोकांचं अभिवादन स्वीकारतात... प्रत्येकाशी आवर्जून बोलतात आणि लगेच पुढे निघतात.. ज्योतिरादित्य शिंदेंच्या मते शिवराज सिंह सरकारचे दिवस आता भरलेत. येत्या नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेशची जनता त्यांना घरी बसवण्याच्या तयारीत आहे.