महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेशातही सत्तासंघर्ष? ज्योतिरादित्य शिंदेंनी बदललं ट्विटर स्टेट्स
काँग्रेसमध्ये ही संघर्षाची चिन्ह...
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतान आता मध्य प्रदेशमध्ये देखील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. कारण माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही बदल केले आहेत. त्यांनी आता लोक सेवक आणि क्रिकेट चाहता असं म्हटलं आहे. शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अशी माहिती काढून टाकली आहे. त्यांनी यामध्ये कुठेही काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेस पक्ष मध्य प्रदेशात सत्तेत आहे. शिंदे यांनी कर्जमाफी, पूरग्रस्तांना मदतीसाठी सर्वे आणि वीजकपात या मुद्द्यांवर कमलनाथ सरकारवर टीका केली होती. कमलनाथ सरकारवर टीका करण्य़ाची कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावर सारवासारव करण्याचा ही प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की, मला नाही माहित की या गोष्टीला का इतकं महत्त्व दिलं जात आहे. मी एक महिन्याआधीच ते बदललं आहे. काही लोकांनी ही माहिती खूप मोठी दिसत असल्याचं म्हटलं होतं.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काश्मीर मधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर या निर्णयासाठी मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. शिंदे समर्थक मंत्री आणि आमदार मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड करण्याची मागणी करत आहेत. याआधी त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी देखील त्यांच्या समर्थकांनी केली होती. यासाठी त्यांनी भोपाळमध्ये प्रदर्शनं देखील केलं होतं.