उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला अपघात, ५० जण जखमी
उत्तर प्रदेशमध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकली आणि त्यानंतर हा अपघात झाला. यामुळे रेल्वे इंजिनसह १० डबे रुळावरुन घसरले. या अपघातात जवळपास ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघात जखमी झालेल्यांपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. रात्री २ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात झाला. औरय्यातील अछल्दा आणि पाता रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. उत्तरप्रदेशात एका आठवड्यात घडलेला हा दुसरा रेल्वे अपघात आहे.
अपघातानंतर एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य सुरु करण्यात आलं. तसेच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अपघातानंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवर माहिती दिली की, कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकली आणि त्यानंतर हा अपघात घडला. काही प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी स्वत: तेथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.