भोपाळ : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सज्ज झालेत. त्यांनी आज सकाळी राजभवनात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. येत्या १७ तारखेला कमलनाथ शपथ घेणार असून यावेळी कांग्रेसचे बडे नेते भोपाळमध्ये उपस्थित राहतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून कमलनाथ यांच्या नावावर अखेर रात्री उशिरा शिक्कामोर्तब करण्यात आलय. कमलनाथ यांची गटनेता म्हणूनही निवड करण्यात आली. या निवडीनंतर कमलनाथ यांनी समर्थन दिल्याबद्दल ज्योतिरादित्य यांचेही आभार मानले. मध्य प्रदेशात काँग्रेस मागील पंधरा वर्ष सत्तेपासून दूर होता. यावेळी मात्र मतदारांनी कौल दिल्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे.  



 


कमलनाथ का, हे आहे कारण?


कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांच्यापैकी आमदारांचा कौल आजमावण्यासाठी राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांना बुधवारी भोपाळला पाठवले होते. ज्योतिरादित्य हे राहुल यांच्या जवळचे आहेत. मात्र, असे असताना मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला काठावर बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला बसपचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्ष यांना बरोबर घेऊन सरकार चालवावे लागणार असल्याने राजकीय डावपेचात मुरलेला तसेच, प्रशासनाची जाण असलेला मुख्यमंत्री हवा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळाली.


तसेच कमलनाथ यांच्याकडे अनुभव असून त्यांची राज्यव्यापी संपर्क यंत्रणाही आहे. त्यांचे भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. बसपाच्या मायावतींनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी कमलनाथ यांनी मायावतींशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते.