भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. दरम्यान, युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे चेहऱ्यावर आनंद दाखवत असले तरी त्यांच्या देहबोलीतून ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कमलनाथ थेट भोपाळला आलेत. दिल्लीत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाली नाही. भोपाळमध्ये आल्यानंतर कमलनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री उशीरा कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये उप मुख्यमंत्री नसेल असंही सांगितले जात आहे, याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना होती. मात्र, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची पसंती ही कमलनाथ यांना होती. त्यामुळे दिल्लीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. राहुल गांधी यांनी आपली आई आणि बहिण यांच्याशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर कमलनाथ भोपाळला रवाना झालेत. रात्री 11 वाजता कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आले.