नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थी राजकारणातून उदयास आलेल्या कन्हैया कुमारने (kanhaiya kumar) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. यानंतर त्याच्यावर बरीच टीकाही झाली आणि काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. कन्हैया कुमारच्या प्रवेशानंतर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावरही आरोप केले. कन्हैया कुमारने मात्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बाजू घेत त्यांना एक प्रामाणिक व्यक्ती म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्हैया कुमारने म्हटलं आहे की, राहुल गांधी कोणत्याही भीतीशिवाय सरकारला प्रश्न विचारतात. कदाचित ते ईडी (ED) ला घाबरत नसल्यामुळे असेल. जे प्रामाणिक आहेत तेच कोणत्याही भीतीशिवाय सरकारसमोर प्रश्न उपस्थित करत आहेत. 


पंजाब आणि छत्तीसगडमध्ये पक्षांतर्गत मतभेदांवरही कन्हैया कुमारने काँग्रेसचा बचाव केला आहे. सद्यपरिस्थितीत भाजपशी (BJP) लढण्यासाठी काँग्रेस पक्ष हा देशातील एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे. ते म्हणाले की प्रत्येक कुटुंबात नेहमीच काही ना काही तक्रारी असतात, मतभेद असतात. पण, एकीकडे भाजप असेल तर दुसरीकडे फक्त काँग्रेस आहे. काँग्रेस हा पक्षातील सर्वात जुना आणि लोकशाहीवादी पक्ष आहे.


काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते नाराज


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी गुरुवारी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की सध्या काँग्रेस पक्षात ज्या प्रकारची परिस्थिती आहे ती अजिबात चांगली नाही. पक्षाच्या या अवस्थेसाठी तीन लोक जबाबदार आहेत, त्यापैकी एक राहुल गांधी आहेत ज्यांच्याकडे कोणतेही पद किंवा जबाबदारी नाही आणि तरीही ते निर्णय घेत आहेत.