कोरोनाग्रस्त गायिका कनिका कपूरचे नखरे पाहून डॉक्टर कंटाळले
कनिका रुग्णालयात एका रुग्णासारखी नव्हे तर स्टार सारखीच वागतेय
नवी दिल्ली : कोरोनाची लागण झालेल्या गायिका कनिका कपूरला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पण तिथले संचालक डॉ. आरके धीमान यांनी लेखी निवेदन जारी करत कनिकावर उपचारादरम्यान सहकार्य करत नसल्याचा आरोप केलाय. ती रुग्णालयात एका रुग्णासारखी नव्हे तर स्टार सारखीच वागत असल्याने कर्मचारी वर्ग नाराज आहे. सर्व सुविधा पुरवल्यानंतरही तिचे नखरे कमी होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी लखनऊमध्ये कनिकाची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये ती पॉझिटीव्ह होती. १५ मार्चला ती लंडनहून लखनऊला आली होती पण विमानतळ कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन वॉशरुममध्ये लपून राहून तिथून पळाल्याची माहिती सांगितली जात आहे. यानंतर कनिका ३ पार्ट्यांमध्ये सहभागी झाली.
तिच्या निष्काळजीपणामुळे तिच्यावर चार गुन्हे दाखल करण्यात आले. हजरतगंज, महानगर, गोमातीनगर आणि सरोजनी नगर पोलीस स्थानकात तिच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
इतकं सार होऊनही तिच्या वागणुकीत बदल झाला नसल्याचे पीजीआय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाची साखळी
कनिका लखनऊमध्ये ती ३-४ पार्ट्यांमध्ये होती. कानपूर देखील गेली. दरम्यान तीनशे ते चारशे जणांच्या संपर्कात आली. लखनऊ ती ज्या पार्टीत होती ती राजकीय पार्टी होती.
यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह तसेच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील होते.
अनेक नेत्यांचे कुटुंब देखील इथे होते. आता वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. पण कोरोनाची ही साखळी बनत चालली आहे.
कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसहित शेकडो व्यक्ती पार्टीला गेल्या नसत्या आणि त्यांनी समजदारी दाखवली असती, स्वत: पार्टीला न जाता इतरांनाही यापासून रोखले असते. तर आज लखनऊ पासून संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत भीतीचे सावट पोहोचले नसते.
आता कनिकाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची वैद्यकिय स्थिती काय आहे ?, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
सेलिब्रिटी व्यक्तीने का खबदारी घेतली नाही? तसेच लंडनवरुन परतल्यानंतर तिची तपासणी झाली होती का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.