बंगळूर :  मुंबई उत्तर भारतीय - मराठी वाद कायम असताना तिकडे कर्नाटकमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये जे राहतात, त्यांनी कन्नड भाषा शिकणे कम्पल्सरी असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्नड न शिकणे म्हणजे या भूमीचा अपमान करण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
आज कर्नाटकचा स्थापना दिवस आहे. त्यावेळी ते बोलत होते. 


ते म्हणाले, कर्नाटकमध्ये राहणारे  सर्वजण कन्नड नागरिक आहेत.  या राज्यात कोणीही राहत असो, त्यांनी कन्नड शिकणे कम्पल्सरी आहे. तसेच त्यांच्या मुलांनाही शिकविले पाहिजे. सरकारी शाळांमधून काढून विद्यार्थ्यांचे नाव इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालण्याची वाईट प्रवृत्ती सध्या सर्वत्र दिसत आहे, अशी टीका करीत राज्यातील सर्व शाळांमध्ये कन्नड विषय शिकविणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. 


प्राथमिक शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतूनच दिले पाहिजे, अशी सूचना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या दोन पत्रांमधून आपण केली असल्याची माहिती सिद्धरामय्या यांनी दिली. पण त्यावर काही उत्तर आले नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत ते म्हणाले, माझे कन्नड भाषेवर प्रेम आहे, पण अन्य भाषांचा मी अनादर करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांमध्ये  मराठी शिकवले जात नाही. इंग्रजीसोबत दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकवले जाते. त्यामुळे आता सिद्धरामय्या यांचा हा राग महाराष्ट्रातही वेगवेगळ्या पक्षांकडून आळवला जाऊ शकतो.