Kapil Sibbal on Atiq Ahmad killing: गँगस्टर-राजकारणी अतीक अहमद (Atiq Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांची कोर्टाच्या बाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. वकील उमेश पाल हत्या प्रकरणी आरोपी असणाऱ्या अतीक अहमदच्या हत्येचा थरार टीव्हीवर सर्वांनी लाइव्ह पाहिला. अतीक अहमदच्या मुलाला चकमकीत ठार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची कोर्टाबाहेर हत्या झाल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली. दरम्यान काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी अतीक अहमद प्रकरणी आठ मुद्दे उपस्थित केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल सिब्बल यांनी ट्विट केलं असून the art of elimination असं म्हटलं आहे. सोबतच त्यांनी आठ निरीक्षणं नोंदवली आहेत. यामध्ये त्यांनी रात्रीच्या वेळी चेक-अप करणं, प्रसारमाध्यमांनी जवळ येऊ देणं, महागड्या आणि परदेशी शस्त्रांचा वापर आणि आरोपींचं आत्मसमर्पण असे मुद्दे उपस्थित केले आहेत. 


ट्वीटमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न - 


1) रात्री 10 वाजता मेडिकल चेक अप?
2) मेडिकल इमर्जन्सी नसणं
3) आरोपींना चालायला लावणं
4) मीडियाला न रोखणं
5) हल्लेखोर घटनास्थळी एकमेकांना ओळखत नसणं?
6) 7 लाखांपेक्षा जास्त किंमतीची शस्त्रं
7) गोळीबाराचं चांगलं प्रशिक्षण
8) तिघांचंही आत्मसमर्पण



विरोधकांनी आधीच ही ठरवून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप केला असून, कपिल सिब्बल यांनी आता हे प्रश्न उपस्थित करत त्यास पाठबळ दिलं आहे. कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्रातील भाजपा सरकारवर यानिमित्ताने निशाणा साधला आहे. 


समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या हत्येनंतर योगी आदित्यनाथ सरकार आणि प्रशासनावर टीका केली आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने महत्त्वाच्या मुद्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


नेमकं काय झालं होतं?


अतीक अहमद आणि अशरफ यांना पोलीस मेडिकल चेक-अपसाठी घेऊन जात असताना प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरलं होतं. यावेळी पत्रकार म्हणून आलेल्या आरोपींनी दोघांवर गोळीबार करत जागेवरच त्यांना ठार केलं. 


दरम्यान अतीक आणि अशरफ यांना इतक्या उघडपणे का नेलं जात होतं असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातही रात्रीच्या वेळी मेडिकल चेक-अपला नेणं यावरही शंका उपस्थित होत आहे. 


विशेष बाब म्हणजे हत्येनंतर अरुण मौर्य, लवलेश तिवारी आणि सनी यांनी पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांचा दावा आहे की, अतीक आणि अहमद यांनी अंडरवर्ल्डमध्ये आपलं नाव व्हावं यासाठी ही हत्या केली. 


पोलिसांनी आपल्याला हल्लेखोरांकडून तीन पिस्तूल सापडल्याचं सांगितलं आहे. यामधील दोन पिस्तूल तुर्कीच्या असून एक देशी बनावटीची आहे. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात लाइव्ह कैद झाला होता.